इंग्लिश भाषेतील विख्यात लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे ११ ऑगस्ट २०१८ रोजी लंडन येथे निधन झाले. त्याला आज तीन वर्षे झाली.
लेखकाच्या साहित्याचा विचार करताना त्याच्या साहित्यकृतीमधून ऐकू येणारा ‘आवाज’ फार महत्त्वाचा ठरतो. २००१ चा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार नायपॉल यांना मिळाला होता. तो देताना त्यांच्या साहित्यातून ऐकू येणाऱ्या लेखकाच्या या ‘आवाजा’चा गौरव करण्यात आला होता. नोबेल देणाऱ्या स्वीडिश अकादमीने म्हटले होते : ‘अनुकरण करणे अशक्य असा अजोड आवाज या लेखकापाशी आहे.’ ‘जगाची सफर करणारा हा साहित्यिक आहे.’ ‘साहित्यिक फॅशन्सपासून तो पूर्णपणे अलिप्त आहे’. स्वत: नायपाॅल यांची प्रतिक्रिया अशी होती की हा दोन देशांचा सन्मान आहे. एक देश म्हणजे माझं घर असलेलं इंग्लंड, तर दुसरा माझ्या पूर्वजांचे घर असलेला भारत!
नायपाॅल हे जन्माने वेस्ट इंडिअन म्हणजे करिबिअन, वंशाने उत्तर भारतीय ब्राह्मण (आर्य तर नव्हेत?), विचारसरणीने आधुनिक ब्रिटिश म्हणजे युरोपियन. लेखक म्हणून ते कोण आहेत, हा मोठाच प्रश्न आहे. इंग्लिश भाषेवर त्यांनी कमालीचे प्रभुत्व मिळवलेले होते. मात्र या भाषेतील साहित्यिक परंपरा मात्र त्यांना आपलेसे वाटलेले नाही. तेव्हा एका दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर ते “उपरे” ठरतात असेच म्हणावे लागेल.
नायपॉल यांचा हा आवाज “अजोड” असला तरी तो निश्चितपणे “आधुनिकते” चाच आवाज आहे. आधुनिकतेच्या सर्व गुण-दोषांसह, मर्यादांसह हा आवाज त्यांच्या कादंबऱ्यांतून आणि इतर लेखनामधून सतत आणि स्पष्टपणे ऐकू येतो. कसा आहे हा आवाज? ‘द मीस्टिक मॅस्यूर’ (१९५७) या त्यांच्या पहिल्याच कादंबरीत वेस्ट इंडीजमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय समाजामधील विवाहसंस्थेच्या ऱ्हासाचे चित्रण करताना तो ऐकू येतो. कादंबरीतील मुख्य पात्र गणेश रामसुमर हा मालिशवाला आहे. त्याचे लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बायकोला झोडपण्याचा विधी होतो.
Leela continued to cry and Ganesh loosened his leather belt and bet her. She cried out, 'Oh God! He go kill me today self!' It was their first beating, a formal affair done without anger on Ganesh's part or resentment on Leela's; and although it formed no part of the marriage ceremony itself, it meant much to both of them. ...Ganesh had become a man; Leela a wife as privileged as any other big woman.
नायपॉल दोस्तोयेव्स्कीसारखे ‘बहुआवाजी’ लेखक नक्कीच नाहीत. त्यांच्या आवाजाची दोन महत्त्वाची वैशिष्टय़े म्हणजे एका बाजूला स्वच्छंदतावादी लेखकांमध्ये आढळणारा हा आत्मकेंद्री आवाज आहे आणि त्याचबरोबर विडंबनकाराची छिद्रान्वेषी वृत्तीही या आवाजातून जाणवत राहते. उपहास हा त्यांच्या या आवाजाचा स्थायीभाव आहे. उपरोध आणि विडंबन ही पूरक अस्त्रे आहेत. ऱ्हास होत जाणाऱ्या वासाहतिक समाजावर कोरडे ओढताना हा आवाज कर्कशही होतो. ‘अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास’ (१९६१) ही नायपॉल यांची सर्वात गाजलेली कादंबरी आहे. ‘घर’ हे मिस्टर बिस्वास या मुख्य पात्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्रिनिदादची वासाहतिक पाश्र्वभूमी या कादंबरीला आहे. तेथील भारतीय जीवनाच्या ऱ्हासाचे चित्रण करतानाच मिस्टर बिस्वास आपली अस्मिता घराच्या रूपात शोधतो आहे. श्रीमंत तुलसी कुटुंबातील अनेक उपवर मुलींपकी शमा या मुलीसाठी त्याला अडकविले जाते. स्वत:चे घर मिळविणे म्हणजे आपले स्वत्व सापडणे अशी त्याची धारणा आहे. येथे कादंबरीच्या प्रोलॉगमधील नायपॉल यांचा आवाज ऐका :
How terrible it would have been at this time to be without it : to have died among the Tulsis, amid the squalor of that large disintegration and indifferent family; to have left Shama and the children among them in one room; worse, to have lived and died without even attempting to lay claim to one's portion of the earth; to have lived and died as one had been born, unnecessary and unaccomodated.
मिस्टर बिस्वासला त्याचे घर मिळते खरे; पण ते गहाण टाकलेले असते आणि त्याला वयाच्या ४६ व्या वर्षीच मृत्यू येतो. आधुनिकतेमध्ये अनुस्यूत असणारी अस्तित्वलक्षी चिंताही नायपॉल आपल्या अजोड आवाजातूनच व्यक्त करतात. जेम्स जॉइससारख्या काही आधुनिकतावादी कादंबरीकारांनी केलेले ‘आवाज’विषयक ‘प्रयोग’ नायपॉल यांनी केलेले नसले, तरी मानवी अस्तित्वाचा उपरेपणा आणि त्यावर उतारा शोधण्याची मानवी व्यक्तींची धडपड याचे विदारक चित्रण करण्यासाठी लागणारा समर्थ आवाज नायपॉल यांच्यापाशी नक्कीच होता.
विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांचा जन्म १७ ऑगस्ट १९३२ रोजी वेस्ट इंडीज वा कॅरेबिअन बेटांपकी त्रिनिदाद या बेटावर झाला. त्यांचे घराणे सुशिक्षित होते. भारतीय मजुरांना शिक्षण देण्यासाठी त्यांचे आजोबा त्रिनिदादमध्ये आले व तेथेच स्थायिक झाले. नायपॉल यांनी कॉलेजचे शिक्षण त्रिनिदादमध्येच घेतले. मात्र, १९५० मध्ये ते ऑक्सफर्ड विद्यापीठात इंग्रजी साहित्यात बी. ए. करण्यासाठी दाखल झाले आणि नंतर लेखनाचा व्यवसाय स्वीकारून लंडनमध्येच स्थायिक झाले. पाश्चात्त्य समाजाचा सांस्कृतिक वर्चस्ववाद त्यांनी स्वीकारलेला दिसतो. वासाहतिक समाजांचे अत्यंत कठोर मूल्यमापन त्याच फूटपट्टय़ा लावून त्यांनी केलेले आहे.
१९६० नंतर वासाहतिक शोषण झालेल्या अनेक देशांचे दौरे त्यांनी केले. गुलामगिरी आणि ख्रिस्ती धर्म यांच्या प्रभावामुळे अनेक देशांना स्वत:च्या निष्ठा वा मूल्ये राहिलेली नाहीत, हे त्यांनी अत्यंत कठोर आवाजात मांडले. ‘अनुकंपा’ ही एक राजकीय खेळी आहे, असे त्यांचे मत होते. लेखकाकडे विश्लेषक बुद्धी असावी लागते, ही त्यांची भूमिका त्यांनी ठामपणे मांडली.
मात्र, जॉर्ज लॅमिंग या वेस्ट इंडियन कादंबरीकाराने ‘द प्लेझर्स ऑफ एक्झाइल’ (१९६०) या पुस्तकात स्वत:च्या देशातून पळ काढणाऱ्या नायपॉलसारख्या लेखकांवर दुतोंडीपणाचा आरोप करून त्यांच्या लेखक म्हणून जाणिवा फारशा सखोल नाहीत, अशी टीका केली आहे. ‘अॅन एरिया ऑफ डार्कनेस’ (१९६४), ‘इंडिया: अ वूण्डेड सिव्हिलायझेशन’ (१९७७) आणि ‘इंडिया : अ मिलियन म्युटिनीज् नाऊ’ (१९९०) या भारताविषयीच्या पुस्तकांतही त्यांचा रोखठोक आवाज स्पष्ट ऐकू येतो, यात शंकाच नाही. दारिद्र्य, घाण आणि दुर्गंधी, रूढिप्रियता, आत्मसंतुष्टता आणि भोंदूपणा यांवर त्यांनी ओढलेले कोरडे हे योग्यच आहेत. परंतु या कठोर चित्रणामागे आणि बुलंद आवाजामागे काही सखोल सामाजिक-सांस्कृतिक चिकित्सा आहे असे म्हणता येणार नाही. दुसरे असे की, पहिल्या पुस्तकात भारताला ‘अंधेर-नगरी’ (एरिया ऑफ डार्कनेस) असे छद्मीपणे नाव ठेवल्यानंतर १९७५-७६ च्या आणीबाणीच्या काळात लिहिलेल्या पुस्तकात नायपॉल यांचा सूर बदलू लागतो. आता त्यांना व्रणांची आठवण होते आणि भारत ही एक ‘जखमी झालेली संस्कृती’ आहे असे ते आग्रहाने मांडू लागतात
The past must be seen to be dead; or the past will kill. …But in the present uncertainty and emptiness there is the possibility of a new beginning, of the emergence in India of mind, after the long spiritual night.
१९९० मध्ये त्यांना भारतातल्या कोटय़वधी माणसांमध्ये नवे आत्मभान निर्माण होते आहे आणि त्यातून कोटय़वधी बंडे घडून येत आहेत असा साक्षात्कारही होतो :
A million mutinies, supported by twenty kinds of group excess, sectarian excess, religious excess, regional excess : the beginning of self-awareness, it would seem, the beginning of an intellectual life already negated by old anarchy and disorder.
भाजपचे वाजपेयी सरकार 1998 मध्ये केंद्रामध्ये सत्तेत आल्यावर नायपाॅल यांनी केन्या या पूर्व आफ्रिकेतील देशामधल्या भारतीय दूतावासामधील हाय कमिशनरला असा निरोप पाठवला की केन्याच्या शासनाने भारतीय वंशाच्या लोकांची जी छळणूक चालवली आहे तिच्याविषयी केवळ शाब्दिक निषेध करून पुरणार नाही. त्यांना अद्दल घडवण्यासाठी या सरकारने केन्याच्या मोंबासा या महत्त्वाच्या बंदरावर हल्ला करून ते बेचिराख करून टाकलं पाहिजे!!! ही प्रतिक्रिया अत्यंत विचित्र आणि हिंसक होती यात शंकाच नाही.
नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारविषयी मात्र नायपाॅल यांनी प्रतिक्रिया दिलेली ऐकिवात नाही. मात्र त्यांची आधुनिक मूल्यांविषयीची आस्था लक्षात घेता आजच्या धार्मिक असहिष्णुतेचा आणि परंपरावादाचा त्यांनी आपल्या बुलंद आवाजात निषेधच केला असता, यात शंका नाही.